(मुंबई)
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी यात नोंदणी केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.
पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी
या स्पर्धेची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे. तर महेंद्र गायकवाड हा उपमहाराष्ट्र केसरी विजेता ठरला आहे. अंतिम सामन्यानंतर महाराष्ट्र्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करत ३ वर्षांसाठी निलंबन केले आहे.
सामन्यानंतर गोंधळ
या स्पर्धेमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना पंचायत सोबत वाद घालणं भोवलं आहे. दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारली. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. अंतिम सामन्यातदेखील गोंधळ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.
राज्य कुस्तीगीर परिषदेने बैठक घेऊन दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये तीन वर्षे खेळता येणार नाही. “पंचांनी दिलेल्या निर्णय बरोबर होता. खेळाडूंनी खिळाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. ते यावेळी घडलं नाही. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. शिवराज राक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्ती झाली. महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाईममध्ये पंचांसोबत वाद घातला, शिवीगाळ केली. आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे एका खेळाडूला न शोभणारं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही तीन वर्षासाठी निलंबित केले आहे,” अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली.
शिवराज राक्षे याने आपला रिव्हूय दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर शिवराजचे प्रशिक्षक काका पवार म्हणाले, दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचानी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. त्याचे वर्षे वाया गेलेच ना.? वर्षभर तयारी केलेली असते त्या रागातून असे घडू शकते. जर शिवराजचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकली नसेल तर त्यातून त्याला राग आला असेल, असे काका पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवराजचे असे म्हणणे आहे की, तिसऱ्यांदा आपल्याला सलग महाराष्ट्र केसरी जिंकण्याची संधी होती. ती हिसकावून घेण्यासाठी माझ्याविरोधात निर्णय देण्यात आला. सलग तीन महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्याला सरकारी नोकरी दिली जाते. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन पृथ्वीराज मोहोळचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.