( पुणे )
लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना जाहीर करण्यात आला आहे. देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ट्रस्टने त्यांच्या नावाची घोषणा केली. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत माहिती दिली.
यंदा 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 106 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात दुपारी 12 वाजता पुण्यातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही डॉ. रोहित टिळक यांनी दिली.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक असे आहे. 1983 पासून हा पुरस्कार राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रदान करण्यात येत असून, देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी तो एक मानला जातो.
यावेळी बोलताना डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे बळ दिले आहे. दहशतवादविरोधी कारवाया, गुप्त मोहिमा, सीमावर्ती सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रणनीती यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळेच त्यांना अनेकदा ‘शत्रूराष्ट्रांचा कर्दनकाळ’ अशी ओळख दिली जाते.
ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन हॉट परसूट, बालाकोट हवाई हल्ला, तसेच डोकलाम सीमावादावेळी झालेल्या राजनैतिक वाटाघाटींमध्ये अजित डोवाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन, धोरणात्मक निर्णय आणि संवेदनशील आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी सातत्याने नेतृत्व केले असून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम बनविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे ट्रस्टने नमूद केले आहे.
अजित डोवाल यांनी 33 वर्षांहून अधिक काळ गुप्तचर अधिकारी म्हणून देशाची सेवा बजावली आहे. त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, त्या संस्थेचे संचालक म्हणूनही काम केले आहे. दहशतवादविरोधी मोहिमा, गुप्त कारवाया आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील ऑपरेशन्समध्ये त्यांनी बजावलेली भूमिका देशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सुरक्षा धोरणे प्रभावीपणे मांडण्यातही त्यांचे योगदान मोठे असल्याचे डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. 1983 मध्ये समाजवादी नेते एस. एम. जोशी हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये देशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक दिग्गजांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती राहुल बजाज, डॉ. जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथानू पिल्लई, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पूनावाला, सुधा मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
यावेळी डॉ. रोहित टिळक यांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा पुनरुच्चार करत “स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार” ही लोकमान्यांनी दिलेली चतुःसूत्री आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले. राष्ट्रहित, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची प्रेरणा देणारे लोकमान्यांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अजित डोवाल यांना जाहीर झाल्याने देशभरातून त्यांचे अभिनंदन केले जात असून, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

