( कोल्हापूर / वृत्तसंस्था )
कोल्हापूरातील गोकुळ शिरगाव येथील नामांकित युनिटी मोटर्स कंपनीची तब्बल 2 कोटी 36 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत गुजरातमधील अहमदाबाद येथून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईतील विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे 20 ते 25 वयोगटातील उच्चशिक्षित असून त्यामध्ये एका ऑटोमोबाईल इंजिनिअरचाही समावेश आहे. तांत्रिक ज्ञानाचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ‘Boss Scam’ किंवा ‘Whale Phishing’च्या माध्यमातून हा गुन्हा करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
सायबर पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी सुरुवातीला कंपनीतील काही कर्मचाऱ्यांच्या मोबाईल आणि संगणकांवर संशयास्पद APK आणि ZIP फाईल्स पाठवल्या. या फाईल्स डाउनलोड झाल्यानंतर आरोपींना कंपनीच्या वेब सेशन, संवाद प्रणाली आणि काही डिजिटल माहितीपर्यंत प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी कंपनीचे मालक, वरिष्ठ अधिकारी आणि अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांमधील संवादाची पद्धत, आर्थिक व्यवहारांची प्रक्रिया, अधिकृत संदेशांची शैली आणि कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला. या माहितीच्या आधारे आरोपींनी कंपनीच्या मालकाचा फोटो वापरून बनावट WhatsApp प्रोफाइल तयार केले आणि अकाउंट विभागाशी संपर्क साधत, “मी बॉस बोलतोय… नवीन व्यावसायिक करारासाठी तातडीने पैसे पाठवा,” असा संदेश पाठवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच आदेश असल्याचा विश्वास बसल्याने कंपनीच्या अकाउंट विभागाने कोणतीही अतिरिक्त पडताळणी न करता आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये दोन दिवसांत चार व्यवहारांद्वारे तब्बल 2 कोटी 36 लाख रुपये वर्ग केले.
काही वेळानंतर कंपनीच्या खात्यातून मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर युनिटी मोटर्सने गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे आणि कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बँक व्यवहार, मोबाईल तांत्रिक माहिती, डिजिटल पुरावे, IP लॉग्स आणि आर्थिक व्यवहारांच्या साखळीचा मागोवा घेत तपास गुजरातमधील अहमदाबादपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने अहमदाबाद येथे छापेमारी करून राजेश उर्फ डी. के. गिरधारीलाल गुरनानी (53), देव परेशभाई त्रिवेदी (24), भावीन खांडेरा (23), जतीन पाल (20) आणि अर्पित पांडे (23) या पाच आरोपींना अटक केली. तपासादरम्यान देव त्रिवेदी हा ऑटोमोबाईल इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींकडून पोलिसांनी युनिटी मोटर्सच्या नावाचे बनावट शिक्के, विविध बँक खात्यांची कागदपत्रे, मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर साहित्य जप्त केले आहे. या साहित्याच्या आधारे आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात सायबर पोलिसांनी तातडीने विविध बँका आणि आर्थिक संस्थांशी समन्वय साधत फसवणुकीतील 82 लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात (फ्रीज) यश मिळवले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम कंपनीला परत मिळणार असून उर्वरित रकमेचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर कोल्हापूर सायबर पोलिसांनी उद्योग, व्यावसायिक आणि नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. केवळ WhatsApp संदेश, ई-मेल किंवा सोशल मीडियावरील निर्देशांवर विश्वास ठेवून मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत. पैसे वर्ग करण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे खातरजमा करणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या APK, ZIP किंवा इतर संशयास्पद फाईल्स डाउनलोड करू नयेत, कारण अशा फाईल्सद्वारे मोबाईल किंवा संगणकावरील माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाऊ शकते. स्वतःचे बँक खाते कमिशनच्या मोबदल्यात इतरांना वापरण्यास देणे किंवा तथाकथित ‘म्यूल अकाउंट’ म्हणून उपलब्ध करून देणे हा देखील गंभीर गुन्हा असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचा 8412841100 हा क्रमांक किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरातील युनिटी मोटर्स प्रकरणाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, “मी बॉस बोलतोय…” या एका बनावट WhatsApp संदेशावर विश्वास ठेवल्यास काही मिनिटांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि सायबर सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे हीच अशा फसवणुकीपासून बचावाची सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे कोल्हापूर सायबर पोलिसांनी अधोरेखित केले आहे.

