(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा आणि संस्कार समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन विविध गाव शाखांमध्ये केले जाते. यावर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा बहुमान तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ३१, वाटद पूर्व गावशाखेला मिळाला आहे.
रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाटद पूर्व बौद्धवाडी येथील ‘जेतवन’ बुद्धविहारात हा वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रम होणार आहे. यावेळी बौद्धजन पंचायत समितीच्या तालुका शाखा महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर प्रमुख प्रवचनकार म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार यांच्यासह तालुका शाखा महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी, विविध उपसमित्यांचे पदाधिकारी, वाटद-खंडाळा-बावीस खेडी बौद्धजन संघाचे पदाधिकारी, गावशाखांचे प्रतिनिधी, श्रामणेर आणि बौद्धाचार्य उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाटद पूर्व गाव शाखेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ‘जेतवन’ बुद्धविहाराची रंगरंगोटी, विहार परिसराची आकर्षक सजावट तसेच कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून परिसरात धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात उपस्थित बंधू-भगिनींना धार्मिक प्रबोधनात्मक प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. भगवान बुद्धांचा कल्याणकारी धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले प्रेरणादायी विचार याबाबत विशेष प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच तालुका शाखेच्या कामकाजाबाबत अध्यक्ष प्रकाश पवार उपस्थितांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम वाटद पूर्व गाव शाखेचे अध्यक्ष संदेश शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी चिटणीस स्वप्निल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रिया जाधव, चिटणीस सोनाक्षी कदम आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. वाटद पूर्व येथील मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती वाटद स्थानिक गावशाखेकडून देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाटद पूर्व गाव शाखेतील सर्व सभासद, तरुण मंडळ आणि महिला मंडळ सज्ज झाले आहेत. या वर्षावास धम्मप्रबोधन कार्यक्रमाला तालुका शाखा तसेच बावीस खेडी बौद्धजन संघाच्या विविध गावशाखांमधील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाटद पूर्व गाव शाखेचे अध्यक्ष संदेश जाधव आणि चिटणीस स्वप्निल जाधव यांनी केले आहे.

