(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील कुवारबाव परिसरात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (७ सप्टेंबर) घडली. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१, रा. वृंदावन सोसायटी, कुवारबाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंन्मुख हे सकाळी बराच वेळ उठले नसल्याने त्यांची पत्नी साधना निंबाळ त्यांना पाहण्यासाठी टेरेसवर गेल्या. त्यावेळी ते गंभीर अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी सुमारे १२.३५ वाजता तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. शंन्मुख निंबाळ यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे. तपासातूनच या दुर्दैवी घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.


