(पुणे)
पिंपरी-चिंचवड परिसर बुधवारी सायंकाळी एका धक्कादायक हत्याकांडाने हादरला. चऱ्होलीतील अलंकारपूरम ९० फूट रोडवर फॉर्च्युनर कारमध्ये एका व्यावसायिकाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची भीषण घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (३८, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) अशी झाली असून ते जमीन खरेदी-विक्री आणि हॉटेल व्यवसाय करत होते.
कारमध्येच गोळी झाडून हत्या
बुधवारी संध्याकाळी नितीन आपल्या दोन मित्रांसह फॉर्च्युनर कारमध्ये बोलत होते. वैयक्तिक कारणावरून सुरू झालेला वाद वाढत गेला आणि चिघळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, काही वेळ कारच्या बाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन पुन्हा पुढच्या सीटवर बसतात आणि त्याच क्षणी आरोपींपैकी एक त्यांच्या डोक्यात गोळी झाडतो. गोळी लागून नितीन यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह रस्त्यावर फेकला, कार पायावरून गेल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट
गोळीबारानंतर आरोपींनी नितीन यांचे शरीर आरोपींनी कारमधून बाहेर फेकले. मात्र त्यांचे पाय दरवाज्यात अडकल्याने आरोपींनी ते जबरदस्तीने ओढून बाहेर काढले. तर कार पळवताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढल्याचेही फुटेजमध्ये दिसते.
गुन्हा दाखल, आरोपींपैकी एक अटक
या प्रकरणी नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले (४०) यांनी दिघी पोलिसांत फिर्याद दिली. अमित जीवन पठारे (रा. पठारे मळा, चऱ्होली) आणि विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) यांच्याविरोधात गुरुवारी (१३ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या पाच पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यापैकी आरोपी विक्रांत ठाकूर लोणावळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिघी पोलिसांनी अँबीव्हॅली परिसरातून त्याला अटक केली. अमित पठारे अद्याप फरार आहे.
नितीन जमीन व्यवहार आणि हॉटेल व्यवसायात सक्रिय होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अलंकारपूरम रस्त्यावर हॉटेल सुरू केले होते. बुधवारी सायंकाळी ते खडी मशीन रस्त्यावर काही ओळखीच्या लोकांसोबत बोलत होते. तेव्हा संशयित कार घेऊन आले, त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि पुढे वाद वाढत जाऊन त्यांचा खून करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपींनी नितीन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून कारसह पसार झाल्याचे स्पष्टपणे दिसते. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

