(रत्नागिरी)
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साळवी स्टॉप येथील पाण्याची साठवण करणाऱ्या टाकीवरील झाकण नसल्याने या टाकीत घाण पडत आहे. त्यामुळे शहराला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका अधिक आहे. या टाकीवर तत्काळ झाकण बसवावे, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा साठा करणारी साळवी स्टॉप येथील टाकीवर झाकण किंवा कोणत्याही प्रकारचे आवरण नाही. या टाकीजवळच ओला आणि सुका कचरा खूप मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. त्यात टाकीवर अनेक प्रकारचे पक्षी तसेच प्राणी भटकत असतात. परिणामी त्या खुल्या झाकणातून लगतचा कचरा आणि विषारी घटक त्या पाण्यात पशू पक्ष्यांकडून किंवा इतर कोणत्याही मार्गाने कधीही मिसळू शकतात. जे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. तसेच अशुद्ध पाण्याचा पुरवठा शहराला झाला तर नवीन रोगराई यायला वेळ लागणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.
लवकरात लवकर त्या टाकीवर झाकण बसवावे. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तत्काळ कारवाई करून झाकण बसवू, असे अभिवचन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले.
हे निवेदन मनसे शहर संघटक तथा महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपचिटणीस अमोल श्रीनाथ यांनी दिले. त्यावेळी उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, राजेश नंदाने, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, आकाश फुटक, ज्येष्ठ नागरिक महेंद्र पवार, यांच्यासह मनसे शाखाध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.