(रत्नागिरी / वार्ताहर)
गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीची सखोल, निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, उपाध्यक्ष सौ. श्रुती ताम्हणकर, शीतल रानडे, संगीता कवितके, रुपाली कदम, स्नेहा चव्हाण, मंडल अध्यक्षा सुचिता नाचणकर, भक्ती दळी तसेच महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, गिरीजा राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराबाबत गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक किंवा इतर दबाव न येऊ देता या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून पीडितेला न्याय मिळेल, याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. तसेच तक्रारीमध्ये अघोरी प्रथा, अंधश्रद्धा किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांबाबत आरोप करण्यात आले असतील, तर त्या आरोपांची उपलब्ध पुराव्यांच्या आधारे स्वतंत्र, सखोल व कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तातडीने आणि निष्पक्ष कारवाई झाल्यास समाजाचा कायदा व न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त करत सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता न्याय्य, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्याचे आवाहन केले आहे.

