(रत्नागिरी)
योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली आहे. योगामुळे शरीर आणि मन सुदृढ राहते. अनेकजण चाळिशीनंतर योगाकडे वळतात, मात्र लहानपणापासून योगाची सवय लागल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतात. शरीरातील साचलेला मळ बाहेर काढण्यासाठी विविध योगासने उपयुक्त ठरतात. आंतरराष्ट्रीय योग दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी केले.
पतंजली योग परिवार, अधिवक्ता परिषद, दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. माळनाका येथील देसाई बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश आर. आर. पाटील, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. एम. एम. जैन, राज्य महिला पतंजली योग समितीच्या संरक्षक सदस्य रमा जोग, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. विद्यानंद जोग, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश अंबाळकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा ठराव मांडल्यानंतर १७७ देशांनी त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर २०१५ पासून जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. पतंजली योग परिवारही दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.
नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी योग ही भारताला लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे सांगत, निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमानिमित्त रा. भा. शिर्के प्रशाला आणि नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार व विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. स्वरदा लोवलेकर व सहकाऱ्यांनी योगनृत्य सादर केले, तर किसान सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष भारत सावंत व सहकाऱ्यांनी गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. योग शिक्षिका नीता साने व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, अधिवक्ता तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग शिक्षक अनंत आगाशे यांनी सूत्रसंचालन केले, तर अधिवक्ता परिषदच्या अॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष मारुती अलकुटे, युवा भारतचे जिल्हाध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्षा हर्षदा डोंगरे तसेच सर्व योगशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

