(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहर परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करत धडक मोहीम राबवली. शुक्रवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ११ हजार ५१८ रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती व्यंकटेश घरत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ एप्रिल रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४.३० या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. शासनाने स्पष्टपणे बंदी घातलेल्या व मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या अन्नपदार्थांची साठवणूक व विक्री सुरू असल्याचे या धाडीत उघड झाले. या प्रकरणी स्वप्निल नरेंद्र गावखडकर (वय ४०, रा. तेली आळी), संजय पांडुरंग तावडे (वय ४१, रा. शिवाजीनगर) आणि महेंद्र रघुनाथ सावंतदेसाई (वय ५९, रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या साठ्याची किंमत ११ हजार ५१८ रुपये इतकी असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

