(दौंड / पुणे )
देशभरातील लाखो वैद्यकीय शिक्षणाच्या इच्छुक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या निकालात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी येथील श्रावणी कृष्णा कुदळे हिने ऐतिहासिक यश संपादन करत ऑल इंडिया रँकमध्ये पाचवा क्रमांक, देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे श्रावणीवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिचे आई-वडील कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत.
710 गुणांसह देशातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान
श्रावणीने 720 पैकी 710 गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
- बायोलॉजी : 360 पैकी 360 गुण
- केमिस्ट्री : 180 पैकी 175 गुण
- फिजिक्स : 180 पैकी 175 गुण
मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून साध्य केले यश
श्रावणीने सांगितले की, या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक दृष्टीकोन हेच मोठे कारण आहे. “मी सुरुवातीपासूनच मनापासून अभ्यास केला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित तयारी केली. क्लास आणि लेक्चरनंतर दररोज सुमारे सहा तास स्वअभ्यास केला. स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याच मेहनतीचे फळ आज मिळाले,” असे श्रावणीने सांगितले. तयारीच्या काळात तिने मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळला तसेच टीव्हीही पाहिला नाही. संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर केंद्रित केले. आपल्या यशाचे रहस्य सांगताना श्रावणीने इतर विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. “यश हवे असेल तर सुरुवातीपासूनच मन लावून अभ्यास करा. कधीही अभ्यासात खंड पडू देऊ नका. घाबरू नका आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा.” असा विद्यार्थ्यांना संदेश श्रावणीने दिला आहे.
श्रावणीचे वडील कृष्णा कुदळे म्हणाले, “श्रावणी इतके मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा नव्हती. सातत्यपूर्ण अभ्यास, लक्ष केंद्रित ठेवणे आणि मोबाईल-टीव्हीपासून दूर राहणे यामुळेच तिने कठीण समजली जाणारी नीट परीक्षा आत्मविश्वासाने दिली. तिचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.” तर आई जयश्री कुदळे यांनी सांगितले, “ग्रामीण भागातील मुलगी देशात मुलींमध्ये पहिली आली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी आम्ही तिला दिल्लीला पाठवणार आहोत.”
यंदाच्या NEET UG 2026 फेरपरीक्षेचा निकालही जाहीर झाला असून, देशभरातील 11 लाख 21 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 3 मे रोजी झालेल्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली होती.
690 पेक्षा जास्त गुण मिळवणारे महाराष्ट्रातील 18 गुणवंत विद्यार्थी
NTA च्या यादीनुसार 690 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवत देशातील अव्वल 138 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 18 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
- श्रावणी कृष्णा कुदळे (AIR 5)
- मोहीनीश मारुती भोसले (AIR 10)
- सार्थक महेश पाटील (AIR 14)
- सानिध्य क्षितिज डोंगरे (AIR 28)
- अर्णव लाहोटी (AIR 32)
- प्रणव पुरणलाल टेंभुर्णे (AIR 33)
- रश्मित गुप्ता (AIR 34)
- सोहम निशिकांत पाटील (AIR 53)
- सागर राजेश कारिकर (AIR 67)
- सौम्य बडोले (AIR 77)
- अनुश्री अजय थोरात (AIR 85)
- आर्य अभिजित दिवेकर (AIR 90)
- साहीम सादिक पटवेगार (AIR 106)
- सुहान सलीम शेख (AIR 116)
- अमीर फिदाएकैम वरावल्ला (AIR 119)
- सार्थक पेठकर (AIR 120)
- श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे (AIR 122)
- गोपाल विजय पाटील (AIR 137)
सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्राच्या या यशामध्ये सर्व प्रवर्गांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनुसूचित जाती (SC), ओबीसी तसेच सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 690 पेक्षा अधिक गुण मिळवत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे यंदाच्या NEET UG 2026 निकालात महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

