(नवी दिल्ली)
केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी ही योजना मोठा आधार ठरली आहे. मात्र, अलीकडेच सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मेंदूशी संबंधित आजार, प्रसूतीसंबंधी शस्त्रक्रिया आणि गर्भाशयाशी संबंधित शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांसाठी आयुष्मान कार्डधारक रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत सेवा मिळणार नाही. या उपचारांसाठी रुग्णांना फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच जाणं बंधनकारक असेल. यामागे सरकारने दिलेले कारण म्हणजे अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा आता बहुसंख्य शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.
याआधी या तिन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांमध्येही योजनेअंतर्गत विनामूल्य केल्या जात होत्या. त्यामुळे गरजूंना खासगी रुग्णालयांतून अधिक वेगवान आणि सुलभ उपचार घेणे शक्य झाले होते. मात्र आता हा मार्ग बंद झाल्यामुळे काही भागात रुग्णांची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ग्रामीण किंवा अर्धशहरी भागांमध्ये, जिथे सरकारी रुग्णालयांमध्ये तांत्रिक सुविधा आणि वैद्यकीय मनुष्यबळ मर्यादित आहे, तिथे रुग्णांना वेळेत उपचार मिळणं कठीण होऊ शकतं.
सद्यस्थितीत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १७६० आजारांवर मोफत उपचाराची तरतूद आहे. या यादीत काही गंभीर आजारही समाविष्ट आहेत. मात्र आता नव्या नियमांनुसार काही आजारांवर केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार करता येतील, यामुळे खासगी रुग्णालयातील विनामूल्य सेवांमध्ये घट झाली आहे.
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
* तुमच्या फोनवर Ayushman App डाउनलोड करा आणि भाषा निवडा.
* नंतर लॉगिन करा आणि Beneficiary वर क्लिक करा.
* यानंतर कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाका
* फोनमध्ये Beneficiary Search पेज उघडेल.
* त्यात पीएम-जे योजना निवडा आणि तुमचा राज्य, जिल्हा आणि आधार क्रमांक भरून लॉगिन करा.
* यानंतर ज्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड बनले आहे त्यांची यादी दिसेल. मात्र ज्याचे कार्ड बनलेले नाही, त्यांच्या नावासमोर ऑथेंटिकेट असा पर्याय दिसेल
* ऑथेंटिकेटवर टॅप करा, आधार क्रमांक टाका- ओटीपी टाका आणि फोटोवर क्लिक करा.
* यानंतर, सदस्याचा फोन नंबर आणि नाते लिहा.
* ई-केवायसी पूर्ण करा आणि फॉर्म सबमिट करा.
* एका आठवड्यात व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही हे कार्ड ॲपवरून डाउनलोड करू शकता.
आयुष्मान कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी आयुष्मान कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते –
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- रेशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
याशिवाय, कामगार कार्ड, ई-श्रम कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र असल्यास, त्याच्या आधारे तुमची पात्रता तपासली जाऊ शकते. पात्र ठरल्यानंतर तुम्ही ५ लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी मोफत आरोग्यसेवा मिळवू शकता.
सरकारच्या या निर्णयामागे जरी रुग्णालयीन पायाभूत सुविधांचा वापर वाढवण्याचा हेतू असला, तरी रुग्णांसाठी हा बदल काळजीपूर्वक अंमलात आणण्याची गरज आहे. अन्यथा, काही भागांतील गरीब व गरजू नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ही योजना जनतेसाठी अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक ठरावी, यासाठी सरकारने आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करत असतानाच रुग्णांच्या गरजांनाही केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे.