(ठाणे)
डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या काल अखेरच्या टप्प्यात शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव शिगेला पोहोचला होता. प्रचारादरम्यान झालेल्या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तुकारामनगर आणि सुनीलनगर भागात शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने गेल्या काही दिवसांपासून वातावरण तणावपूर्ण आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रचारकांकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी केला होता. ही घटना ताजी असतानाच रात्री सुनीलनगर भगतवाडी परिसरात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेत भाजपाच्या महिला उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती आणि कार्यकर्ते ओमनाथ नाटेकर (47) हे गंभीर जखमी झाले आहेत.
रामनगर पोलीस ठाण्यात ओमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली. नितीन पाटील हेही जखमी असून पोलिसांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
तक्रारीनुसार, सोमवारी रात्री प्रचार आटोपून परतत असताना सुनीलनगर भगतवाडी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारासह 50 ते 60 कार्यकर्त्यांनी अडवून शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. त्यानंतर धारदार शस्त्र आणि लोखंडी सळईने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपाचे दोन तर शिवसेनेचे दोन पदाधिकारी जखमी झाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत भाजपाचे कार्यकर्ते कोणतीही परवानगी नसताना परिसरात फिरून मतदारांना पैसे वाटप करत होते, असा दावा केला आहे. पोलिसांना माहिती दिल्यानंतरही कारवाई उशिरा झाल्याने वाद वाढला आणि झटापट झाली, मात्र आपण हल्ला केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीला हिंसक वळण लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दोन रात्री झालेल्या राड्यांमुळे डोंबिवलीतील तुकारामनगर आणि सुनीलनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

