(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील सायले (माईनवाडी) येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप सुटका केली. पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सायले माईनवाडी येथील सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावच्या पोलीस पाटील यांनी देवरूख वनविभागाला दिली. माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांनी सहकाऱ्यांसह आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
पाहणीत संबंधित विहीर सुमारे २० फूट खोल असून ती सिमेंट काँक्रिटची असल्याचे आढळले. बिबट्या विहिरीतील सिमेंटच्या कठड्यावर आधार घेऊन बसलेला होता. परिस्थितीचा अंदाज घेत वन कर्मचाऱ्यांनी लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून तो विहिरीत सोडला. काही क्षणांतच बिबट्या स्वतःहून पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आले.
यानंतर सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, तालुका लघु पशु चिकित्सालय, देवरूख यांच्या माध्यमातून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही बचावमोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपाल सागर गोसावी, वनरक्षक आकाश कडुकर (फुणगूस), वनरक्षक सूरज तेली (आरवली) तसेच प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. बचावकार्यादरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले.
वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास किंवा अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

