(रत्नागिरी / वार्ताहर)
‘जय जवान, जय किसान’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने खंडाळा येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेने परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती मिळावी, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला होता.
मेळाव्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा योजना, मृदा परीक्षण, ठिबक सिंचन अनुदान आदी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी आधुनिक शेती पद्धती, उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना आणि शाश्वत शेतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. मेळाव्यात शेतकऱ्यांनी विविध अडचणी व शंकाही मांडल्या. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी थेट चर्चा करून समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतीविषयक जनजागृती निर्माण करणे, शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजनांची प्रभावी माहिती पोहोचवणे आणि कृषी क्षेत्रात सहकार्याच्या माध्यमातून समृद्धी साध्य करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

