(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवडे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असल्याने या रस्त्याची तातडीने डागडुजी करून खड्डे डांबर व खडीने भरण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरुख येथील उपअभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे. साखरपा-देवडे हा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरील अनेक गावांतील नागरिक साखरपा बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे दररोज या रस्त्यावरून मोठ्या संख्येने नागरिकांची आणि वाहनांची ये-जा सुरू असते.
मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी तसेच लहान वाहनांचे नियंत्रण सुटून घसरण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
या रस्त्याच्या खराब अवस्थेचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना बसत आहे. रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी आवश्यक असतानाही खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिकांना संथगतीने प्रवास करावा लागत असून, त्यामुळे उपचारासाठी पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडीही वाहनचालकांसाठी अडथळा ठरत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. समोरून दोन वाहने आल्यास त्यांना बाजू देणे कठीण होत असून, साईडपट्ट्यांचीही दुरवस्था झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी या मार्गावरून नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ वाढणार आहे. गणेशमूर्ती घेऊन जाणारे भाविक, गणेशोत्सवासाठी गावाकडे येणारे चाकरमानी आणि नियमित प्रवासी यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने रस्त्याची दुरुस्ती अधिक तातडीची बनली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्सवापूर्वी साखरपा-देवडे रस्त्यावरील खड्डे तातडीने डांबर व खडीने भरून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी विद्यासागर तांदळे यांनी निवेदनातून केली आहे.

