[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात काही समाजसेवकांचा वाढता वावर आणि उपचार प्रक्रियेत होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज गुरुवारी ( १६ जुलै) सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. सांगवीकर आणि स्वतःची समाजसेवक म्हणून ओळख करून देणारे जकी खान यांच्यामध्ये अपघात विभागात शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ अपघात विभागातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
डॉ. सांगवीकर हे नेहमीप्रमाणे अपघात विभागात रुग्णांची तपासणी व राउंड घेत होते. त्यावेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांमुळे विभागात आधीच गर्दी होती. अशातच जकी खान दोन पीए घेऊन थेट अपघात विभागात दाखल झाला. विभागातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डॉ. सांगवीकर यांनी शांतपणे, “जो पेशंट असेल तेवढीच व्यक्ती आत थांबा, इतरांनी बाहेर थांबा. असे सांगितले. मात्र, त्यावर जकी खान याने डॉक्टरांशी उद्धट व उलट उत्तरे देऊन शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. “महिलांच्या वार्डमध्ये माझे पेशंट असतात… मी रात्री बारा वाजताही येईन..,” अशा शब्दांत उत्तरे दिली.
यापूर्वीही महिला वॉर्डमध्ये जकी खान हा त्याच्या दोन पीए यांना घेऊन थेट प्रवेश करत असल्याच्या प्रकारावरून डॉ. सांगवीकर यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत जाब विचारला. मात्र, त्यावर जकी खान याने, “माझे पेशंट असतात… मी रात्री बारा वाजता सुद्धा येईन… महिलांच्या वॉर्डमध्ये माझे पेशंट असतात… हा माझा वॉर्ड आहे… माझ्या वॉर्डमधील हॉस्पिटल आहे… मी कधीही येईन… साहेबांना नाव सांगतो तुमचं…” अशा शब्दांत उद्धट उत्तरे दिली. यावर डॉ. सांगवीकर यांनीही ठाम भूमिका घेत, “साहेबांकडे मीच तक्रार करणार आहे,” असे स्पष्टपणे सुनावले. त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा नियमांची जाणीव करून देत, “यापुढे तुम्हाला रुग्णालयात अशा पद्धतीने यायचे असेल, तर डीन सरांची किंवा रुग्णालय प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल,” असे स्पष्ट शब्दात सांगितले. मात्र, त्यानंतरही जकी खान याने “बघून घेऊ…” असे म्हणत त्याठिकाणहून निघून गेला.
या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात काही समाजसेवकांचा वाढता हस्तक्षेप, रुग्णालयातील विविध विभागांतील मुक्त वावर आणि त्यामुळे डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर निर्माण होणारा ताण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. इतर रुग्णांवर उपचार सुरू असताना अशा प्रकारचे वाद रुग्णसेवेवर विपरीत परिणाम करू शकतात, अशी भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल रुग्णालय प्रशासन घेणार का, रुग्णालयातील प्रवेश व शिस्तीबाबत अधिक कठोर नियम लागू केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न?
या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ रुग्णसेवा आणि उपचार यांवर लक्ष केंद्रित करायचे की अशा प्रकारच्या दबावालाही सामोरे जायचे? “साहेबांना नाव सांगतो” अशा शब्दांचा वापर म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न समजायचा का? जर डॉक्टरांनाच अशा पद्धतीने धाक दाखवला जात असेल, तर सामान्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती काय असू शकते, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

