(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर केला. देशभरातील वैद्यकीय, दंतवैद्यकीय (BDS), आयुष (AYUSH) आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत सुमारे 20 लाख उमेदवारांपैकी 11.21 लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदाच्या निकालात पंजाबच्या आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पांशुल बन्सल यांनी प्रत्येकी 715 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर निकाल वेळेत जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशन (Counselling) वेळापत्रकानुसार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
551 शहरांतील 5,440 परीक्षा केंद्रांवर परीक्षा
NTA च्या माहितीनुसार, भारतातील 551 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये एकूण 5,440 परीक्षा केंद्रांवर NEET UG 2026 परीक्षा घेण्यात आली. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी 13 विविध भाषांमधून परीक्षा दिली यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी 58 टक्क्यांहून अधिक उमेदवार मुली आहेत. तसेच, उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 17 ते 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे.
गुणपत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
NEET UG 2026 परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्ड (Scorecard) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
NTA कडून पुढील माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे:
- राष्ट्रीय स्तरावरील टॉपर्सची यादी
- राज्यनिहाय अव्वल विद्यार्थी
- प्रवर्गनिहाय (SC, ST, OBC-NCL, Gen-EWS, PwBD) टॉपर्स
- प्रवर्गनिहाय कट-ऑफ गुण
- भाषेनुसार परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची आकडेवारी
प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशभरातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील MBBS, BDS, AYUSH आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन (Counselling) प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे लक्ष आता प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे.

