(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्था, मालगुंड संचलित मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी सप्ताहाचा समारोप उत्साहात पार पडला. संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे खजिनदार सुरेंद्र माचिवले आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्नेहा पालये यांच्या हस्ते महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कृषी सप्ताहानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण, विविध रानभाज्या व वेलींचे प्रदर्शन, तसेच रानभाज्यांपासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या सर्जनशीलतेसह कृषीविषयक आकलनाचे प्रभावी दर्शन घडविले.
समारोपप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या स्नेहा पालये यांनी शेतीचे बदलत्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीचे महत्त्व कमी झालेले नसून देशाच्या अन्नसुरक्षेसाठी शेती हा मूलभूत आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, हवामानाचा अभ्यास आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर बनविता येऊ शकते. शेती हे केवळ पारंपरिक व्यवसायाचे साधन नसून करिअरच्या दृष्टीनेही अनेक संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत आणि आरोग्यपूरक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार सुरेंद्र माचिवले, प्राचार्या स्नेहा पालये, प्रा. कविता जाधव, प्रा. जितेंद्र बोंबले, प्रा. तेजश्री रेवाळे, प्रा. सुयोग मोहिरे, प्रा. प्रणाल ओरपे, प्रा. केतकी धुमक, प्रा. मैथिली भरणकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाल ओरपे यांनी केले. प्रा. तेजश्री रेवाळे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. सुयोग मोहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कृषी सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि शाश्वत विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

