(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राजकारण्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमांवर शुभेच्छांचे स्टेट्स, बॅनर आणि पोस्ट्सचा अक्षरशः पूर येत असल्याचे चित्र अलीकडे प्रकर्षाने दिसून येत आहे. विशेष म्हणजे या ‘डिजिटल शुभेच्छा संस्कृती’त सरकारी कर्मचारीही सक्रियपणे सहभागी होत असून, शिक्षक वर्ग या बाबतीत अग्रस्थानी असल्याचे वास्तव समोर येत आहे.
सरकारी सेवेत असताना राजकीय तटस्थता राखणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर विभागांतील कर्मचारी अधिकारी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकपर संदेश, फोटो आणि स्टेट्स समाजमाध्यमांवर प्रसारित करताना दिसत आहेत. यामध्ये वैयक्तिक श्रद्धेपेक्षा ‘दिसण्यासाठी’ किंवा ‘ओळख निर्माण करण्यासाठी’ केले जाणारे पोस्टिंग अधिक असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर असे स्टेट्स टाकले जात असल्याने विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होतो, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शिक्षक हा समाजघडणीचा आधारस्तंभ मानला जातो. त्यांच्याकडून राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे सार्वजनिक उद्गार अपेक्षित आहेत का, याबाबत पालकवर्गातही संभ्रम व्यक्त होत आहे. सेवाशिस्त नियमांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय प्रचार, प्रसिद्धी किंवा पक्षीय भूमिका सार्वजनिकरित्या मांडणे टाळणे आवश्यक आहे. तरीही या नियमांकडे दुर्लक्ष करून समाजमाध्यमांवर ‘स्टेट्सबाजी’ सुरू असल्याने प्रशासनाची भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर मौन बाळगले जात असल्याने अप्रत्यक्षपणे या प्रकाराला मोकळीक मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या कर्तव्यपूर्तीवर आणि सार्वजनिक सेवेच्या गुणवत्तेवर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची, विशेषतः शिक्षकांची ही वाढदिवस-स्टेट्स संस्कृती थांबवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना आणि कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचेही आता बोलले जात आहे.

