(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुका युवा सेना आणि श्री ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेंस क्लिनिक, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने ताम्हाणे ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ६५ ते ७० लाभार्थ्यांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.
आमदार किरण उर्फ भैय्या, युवा नेत्या अपूर्वा ताई आणि युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराचे उद्घाटन ताम्हाणे गावचे सरपंच रवी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये नागरिकांची सखोल नेत्रतपासणी करण्यात आली. डोळ्यांशी संबंधित समस्या ओळखून आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, उपविभाग प्रमुख रवी सावंत, महिला विभाग प्रमुख श्वेता पवार, युवती सेना विभाग प्रमुख विद्या लांजेकर, युवा सेना विभाग प्रमुख युवराज मोरे, युवा शाखाप्रमुख अक्षय पुजारी, राहुल गोसावी, शाखाप्रमुख देवा पवार, संदीप बारस्कर, सुरेश ऐनारकर तसेच युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे ग्रामीण भागात सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

