( चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील पेढे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुधीर सुभाष भोसले (वय ४७) यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पेढे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सुधीर भोसले हे विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी निगडित राहून सातत्याने समाजकार्यात सक्रिय होते. त्यांनी भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, प्राथमिक विभागाचे चेअरमन, धावजी देवस्थानचे माजी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी तसेच चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव म्हणून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या होत्या.
राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम, शैक्षणिक कार्य आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध, सहज उपलब्ध होणारा स्वभाव आणि गरजूंना मदतीसाठी तत्पर धावून जाण्याची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या अकाली निधनामुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुधीर भोसले यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, पेढे गावासह संपूर्ण पंचक्रशीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

