(राजापूर / तुषार पाचलकर )
अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालयाच्या प्रस्तावित ठिकाणाबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर येथे आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी बुधवारी ( १५ जुलै ) शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या सुनावणीत विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासनासमोर आपापली भूमिका स्पष्टपणे मांडली.
यापूर्वी या संदर्भात हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर काही ग्रामपंचायतींकडून दोन्ही प्रस्तावित ठिकाणांच्या समर्थनार्थ भूमिका नोंदविल्याचे समोर आल्याने संबंधित ग्रामपंचायतींची अधिकृत भूमिका प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक सुनावणीचे आयोजन केले होते.
सुनावणीदरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाला स्वतंत्रपणे आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच, “आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आहे का?” आणि “आपल्या ग्रामपंचायतीच्या दृष्टीने कोणते ठिकाण अधिक सोयीचे ठरेल?” अशा महत्त्वाच्या प्रश्नांद्वारे प्रशासनाने ग्रामपंचायतींची भूमिका अधिकृतपणे नोंदवून घेतल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
संपूर्ण सुनावणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रांत कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सुनावणीची प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण झाली.
सुनावणीदरम्यान काही व्यक्तींनी वैयक्तिक पातळीवर टिप्पणी केल्याची चर्चा असली, तरी त्याचा अधिकृत प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही. प्रशासनाने सर्वांचे म्हणणे संयमाने ऐकून घेत नियमानुसार कार्यवाही केली.
सुनावणीत नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीने कोणत्या प्रस्तावाला पाठिंबा दिला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आता सार्वजनिक सुनावणीत नोंदविण्यात आलेल्या भूमिका, प्राप्त हरकती, स्थानिक नागरिकांचे म्हणणे आणि प्रशासकीय निकषांचा सखोल विचार करून प्रशासन अंतिम निर्णय घेणार असून, या निर्णयाकडे संपूर्ण राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

