महिला या केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नसतात, तर त्या समाजाचा आणि राष्ट्राच्या प्रगतीचा कणा आहेत. जेव्हा नारी स्वस्थ आणि सक्षम असते, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला बळ मिळते आणि त्यातूनच एक सशक्त परिवार आणि सक्षम राष्ट्र उभे राहते. याच विचारातून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे होय.
आरोग्याचा पाया
कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेताना महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पौष्टिक आहाराची कमतरता, ताण-तणाव आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला न घेणे यांमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. अशक्तपणा, जीवनसत्त्वांची कमतरता आणि आरोग्याच्या समस्या आजही ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी एक मोठे आव्हान आहेत. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये लाखो महिलांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. या अभियानात आयुष्यमान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाडीमध्ये विशेष तपासण्या, लसीकरण आणि समुपदेशन उपलब्ध आहे. आरोग्य विभाग जनजागृती मोहिमेद्वारे कुटुंबातील महिलांना प्रोत्साहन देत आहे.
अभियानाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन दीर्घकालीन सामाजिक बदल घडविणे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, कुष्टरोग, अॕनिमिया आणि सिकल सेल यांची मोफत तपासणी करुन आजारांची लवकर ओळख आणि उपचार शक्य होत आहे.
गर्भवती महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी, लसीकरण, प्रसुतीपूर्व काळजी आणि जननी शिशु सुरक्षा योजना तसेच जननी सुरक्षा योजनेंतर्गत मोफत सेवा देऊन माता-शिशु मृत्युदर कमी करण्यावर भर आहे. पोषण आणि जागृत्तीसत्रांद्वारे संतुलित आहार स्वच्छता कुटुंब नियोजनाचे शिक्षण देऊन प्रत्येक स्त्रीला आरोग्यविषयक सहाय्य देण्यात येत आहे. मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन महिलांना आरोग्य साक्षरतेकडे नेण्याचा मार्ग या अभियानामधून खुला होत आहे. या मोहिमेमुळे महिलांचे आरोग्य सुधारेल, कुटुंब सशक्त होईल, परिणामी राज्याचा आरोग्य निर्देशांक उंच्चावेल. हा निर्देशांक वाढविण्याच्यादृष्टीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

