(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी मुख्य रस्त्यालगत गॅस पाईपलाइन भूमिगत टाकण्याचे काम सुरू असले तरी या कामात ठेकेदार कंपनीकडून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. शास्त्री पूल – आंबेड ते डिंगणी मार्गे गणपतीपुळे या महत्वाच्या रस्त्यावर सुरू असलेल्या खोदाईमुळे दररोज हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात आले असूनही संबंधित प्रशासन गप्प का, असा तीव्र सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हा रस्ता भाविक, पर्यटक, प्रवासी व मालवाहू वाहनांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यातच सीएनजी पंप असल्याने या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ कायमच जास्त असते. रस्ता आधीच अरुंद असताना ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खोदाई करून काढलेली माती, निकामी यंत्रसामग्री व अव्यवस्थित साठवणूक केली आहे. परिणामी रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली असून वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक व्यवस्था नाही. आवश्यक बॅरिकेड्स, सूचना फलक, रात्रीसाठी रिफ्लेक्टर, तसेच वाहतूक नियंत्रित करण्यासाठी दोन्ही बाजूंना झेंडा घेऊन उभे राहणारे कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक खोदाईचे ठिकाण दिसत नसून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खोदाईमुळे रस्त्यावर प्रचंड धूळ उडत असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. धूळ नियंत्रणासाठी रस्त्यावर पाणी मारण्याची साधी खबरदारीही ठेकेदाराकडून घेतली जात नाही. हे सर्व प्रकार प्रशासनाच्या डोळ्यासमोर सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात ग्रामस्थ व डिंगणी गावचे उपसरपंच मिथुन निकम यांनी ठेकेदार कंपनीला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विनंतीपूर्वक सूचना केल्या. मात्र ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष करत काम पूर्ववत सुरू ठेवले. जनतेच्या सूचनांना केराची टोपली दाखवणाऱ्या ठेकेदाराला अभय कोण देत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कामाच्या परवानगीबाबतही गंभीर गोंधळ आहे. ठेकेदार कंपनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) परवानगीने करत असल्याचे सांगते. तर PWD अधिकारी हा रस्ता MSIDC कडे वर्ग असल्याचे सांगून हात झटकताना दिसत आहेत. मग जबाबदारी नेमकी कुणाची? विभागांमध्ये चाललेल्या या ‘खेळखंडोबा’त मात्र सामान्य प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
जोपर्यंत संबंधित विभागाने दिलेल्या परवानगीनुसार सर्व सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत नाहीत, तोपर्यंत हे काम तात्काळ थांबवावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर निश्चित केली जावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
अपघात झाल्यानंतर चौकशी आणि कागदी कारवाई करण्यापेक्षा, प्रशासनाने आत्ताच जागे होऊन ठेकेदारावर कठोर कारवाई करणार का, की पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावरच हालचाल होणार? असा रोखठोक सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

