(रत्नागिरी)
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने आणखी एका उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरीची नोंद केली आहे. रुग्णालयात प्रथमच ग्रामीण भागातील अवघ्या पाच वर्षीय बालकावर ‘ब्रँकियल सिस्ट’ (Branchial Cyst) या दुर्मिळ जन्मजात विकाराची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कान-नाक-घसा (ईएनटी) विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता बागे यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, बालकाची प्रकृती उत्तम आहे.
ब्रँकियल सिस्ट हा गर्भावस्थेदरम्यान मानेतील ऊतींची वाढ पूर्ण न झाल्यामुळे निर्माण होणारा दुर्मिळ जन्मजात विकार आहे. या विकारावरील कायमस्वरूपी उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. मात्र ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जाते, कारण सिस्ट मानेतील प्रमुख रक्तवाहिन्या, महत्त्वाचे मज्जातंतू आणि नाजूक अवयवांच्या अगदी जवळ असते.
ईएनटी विभागाच्या प्रमुख डॉ. सुनिता बागे यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान हायपोग्लोसल, व्हॅगस आणि फेशिअल मज्जातंतूंना इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे जीभ, चेहरा किंवा मानेच्या स्नायूंच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच संसर्ग, रक्तस्त्राव, सूज किंवा रक्ताची गुठळी (हेमॅटोमा) निर्माण होण्याची शक्यताही असते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये चेहरा किंवा जीभेचा तात्पुरता अथवा कायमस्वरूपी पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण सिस्ट अचूकपणे काढून टाकणे हीच या शस्त्रक्रियेची खरी कसोटी असते.
आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान आणि सूक्ष्म नियोजनाच्या साहाय्याने डॉ. बागे यांनी संपूर्ण ब्रँकियल सिस्ट सुरक्षितपणे काढून टाकली. शस्त्रक्रियेनंतर बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून तो लवकरच पूर्णपणे बरा होऊन नियमित आयुष्य जगू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शस्त्रक्रियेपूर्वी बालकाच्या आईच्या मनात मोठी भीती आणि चिंता होती. मात्र डॉ. बागे यांनी उपचारांची सविस्तर माहिती देत समुपदेशन केले आणि धीर दिला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर बालक सुरक्षित असल्याचे पाहून कुटुंबीयांनी डॉ. बागे आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण उपचार शासकीय योजनांअंतर्गत पूर्णपणे नि:शुल्क करण्यात आले. त्यामुळे गरीब आणि गरजू कुटुंबावर कोणताही आर्थिक भार पडला नाही. अत्याधुनिक उपचारही सरकारी रुग्णालयात विनामूल्य उपलब्ध होत असल्याचा विश्वास या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.
या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख आणि डॉ. प्रियांका साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच बालरोग विभागातील परिचारिकांनीही बालकाची उत्कृष्ट काळजी घेतली.
या उल्लेखनीय यशाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. सुनिता बागे आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय सहकार्य वेळेवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. बागे यांनी अधिष्ठात्यांचे आभार मानले. तसेच वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सांगवीकर यांनीही डॉ. बागे यांच्या कार्याचे कौतुक केले.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी अशा जटिल शस्त्रक्रियांसाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असे. मात्र आता रत्नागिरी शासकीय रुग्णालयातच अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि सक्षम वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत असल्याने सर्वसामान्यांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.

