( मुंबई )
रेल्वे तिकीटाचे ऑनलाइन आरक्षण करताना येणारे वारंवारचे कॅप्चा, अनावश्यक पॉपअप्स आणि बुकिंगसाठी लागणारा जास्त वेळ यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी (IRCTC) यांनी तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी वेबसाइटमध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तयार करण्यात आलेली नवीन बीटा आवृत्ती (Beta Version) लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सूचनांनंतर रेल्वे प्रशासनाची तातडीची कारवाई
काही दिवसांपूर्वी जयपूर येथील मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MNIT) च्या विद्यार्थ्यांनी IRCTC वेबसाइटमधील अनेक तांत्रिक त्रुटी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने वेबसाइटमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर IRCTC आणि रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) यांच्या अधिकाऱ्यांनी जयपूरमध्ये विद्यार्थ्यांसमोर नव्या वेबसाइटची बीटा आवृत्ती सादर केली. विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे अंतिम सुधारणा करून ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
नव्या IRCTC वेबसाइटमध्ये काय असतील प्रमुख सुविधा?
नवीन वेबसाइटमध्ये प्रवाशांचा तिकीट बुकिंगचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
- वारंवार येणारे कॅप्चा (Captcha) आणि अनावश्यक पॉपअप्स हटविण्यात येणार.
- जड ग्राफिक्स कमी करून वेबसाइट अधिक वेगवान करण्यात आली आहे.
- सर्व श्रेणींमधील सीट उपलब्धतेची माहिती एकाच स्क्रीनवर पाहता येणार.
- तिकीट बुकिंगसाठी लागणाऱ्या स्टेप्स कमी करण्यात आल्या असून, काही सेकंदांत बुकिंग पूर्ण होईल.
- नियमित प्रवाशांसाठी प्रवाशांची माहिती एकदाच सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध होणार. त्यामुळे प्रत्येक वेळी नाव, वय आणि इतर माहिती पुन्हा भरावी लागणार नाही.
40 वर्षे जुन्या आरक्षण प्रणालीचेही आधुनिकीकरण
IRCTC चे नवीन पोर्टल रेल्वेच्या जवळपास 40 वर्षे जुन्या Passenger Reservation System (PRS) शी जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आरक्षण प्रणालीचेही आधुनिकीकरण सुरू असून, संपूर्ण यंत्रणा अधिक सक्षम आणि जलद बनविण्यात येत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत नवीन IRCTC पोर्टल अधिकृतपणे सुरू केले जाईल.
RailOne App ने गाठला 4 कोटी डाउनलोड्सचा टप्पा
दरम्यान, भारतीय रेल्वेच्या अधिकृत RailOne अॅपने 4 कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला असून, ते देशातील सर्वाधिक वापरले जाणारे रेल्वे तिकीट बुकिंग अॅप ठरले आहे. तात्काळ (Tatkal) तिकीट बुकिंगदरम्यान बॉट्सच्या बेकायदेशीर वापराला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीही विकसित केली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण सूचनांमुळेच IRCTC च्या नव्या वेबसाइटमध्ये हे महत्त्वाचे बदल शक्य झाले असून, याचा थेट फायदा देशभरातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना होणार आहे.

