( पोलादपूर / रायगड )
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पोलादपूरजवळील धोकादायक मानल्या जाणाऱ्या कशेडी घाटात धामणदिवी गावाच्या हद्दीत अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कशेडी घाटातील धामणदिवी गावाजवळ डोंगराचा मोठा भाग खचून रस्त्यावर आला. ही दरड कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने बंद करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा जमा झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहने थांबवण्यात आली आहेत. अचानक झालेल्या या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
एकाच लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. सध्या मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहने सोडण्यात येत असल्याने कशेडी घाट परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांनी शक्यतो या मार्गावरील प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पोलीस आणि महामार्ग प्रशासन घटनास्थळी
दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून महामार्ग प्रशासनाच्या मदतीने रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा आणि दगड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
पावसाळ्यात कशेडी घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका वाढत असल्याने प्रवाशांनी खबरदारी घ्यावी. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि घाट परिसरातून प्रवास करताना सतर्क राहावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

