(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करत एका मुलीची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या नावाखाली सुरु झालेल्या या नात्याचा शेवट विश्वासघातात झाला असून, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने मैत्रीचे नाते गोंजारून मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आर्थिक अडचणीचे कारण सांगत तिच्याकडून सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, बाजूबंद, अंगठी आदी मौल्यवान दागिने घेतले. हे दागिने त्याने एचडीएफसी बँक रत्नागिरी व एका खाजगी पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज उभारले. पण कर्ज घेऊनही तरुणाने हे दागिने परत केले नाहीत. अखेर, या प्रकाराची माहिती मुलीच्या आईला मिळाल्यानंतर तिने १५ मे रोजी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.