(गणपतीपुळे / वैभव पवार)
वाटद-खंडाळा परिसरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत एकाच रात्री तीन बंद घरे आणि एका गोडाऊनला लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाटद-खंडाळा येथील रहिवासी राकेश शशिकांत पवार (वय ४०) यांनी जयगड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ जुलै रोजी रात्री १० ते १३ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाज्यावरील कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर गोदरेज कपाटातील सुमारे १ ग्रॅम वजनाचे, अंदाजे १३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे चोरून नेले.
या चोरीची माहिती मिळाल्यानंतर परिसरात चौकशी केली असता आणखी धक्कादायक बाब समोर आली. आदर्श नगर येथील शुभम श्रीकांत महाडीक यांचे मुंबईला गेल्यामुळे बंद असलेले घर, श्रीराम नगर येथील मंदार श्रीकांत बारगुडे यांच्या बिअर शॉपीचे गोडाऊन तसेच परेश चंद्रकांत गुरव यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडल्याचे उघड झाले.
एकाच परिसरात सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

