(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या सौजन्याने NCMC कार्ड नोंदणी कॅम्प नुकताच आयोजित करण्यात आला. मालगुंड ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या नोंदणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या शुभारंभप्रसंगी पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, सदस्या शुभदा मुळये, शिल्पा पवार आणि सदस्य सन्मान मयेकर उपस्थित होते. या कॅम्पमध्ये सुमारे 97 ग्रामस्थांनी नोंदणीचा लाभ घेतल्याची माहिती सरपंच श्वेता खेऊर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी NCMC कार्ड लागू करण्यात आले आहे. हे कार्ड काढण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. तिकीट खरेदी, पेमेंट आणि प्रवासासाठी एकाच कार्डचा वापर करता येणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, NCMC कार्ड काढताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. या अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेत काही प्रमाणात अडथळे येत असल्याचे दिसून आले.
NCMC कार्डच्या माध्यमातून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सवलत मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.


