(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (ता. ३) सकाळी सातच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.
मृत तरुणाचे नाव महेश बळीराम ठिक (वय ३५, रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास मद्याच्या नशेत महेश यांनी आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार करीत आहेत.

