(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचा माहोल तापू लागला आहे. 3 नोव्हेंबर रोजी ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसीलदार कार्यालये तसेच पंचायत समिती कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी (उपजिल्हाधिकारी) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली.
ही अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या 1 ऑक्टोबर 2025 च्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली असून, यानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा होण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण 56 गट असून त्यापैकी 28 गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जातींसाठी 2 गट (त्यापैकी 1 महिलांसाठी), अनुसूचित जमातींसाठी 1 गट (महिलांसाठी), तर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 15 गट (8 महिलांसाठी) असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील 38 गटांपैकी 18 गट महिलांसाठी आरक्षित आहेत.
जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या नऊ पंचायत समित्यांसाठी एकूण 112 गणांचे अंतिम आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अधिसूचना प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे फटाके लवकरच फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात प्रचारयंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चैतन्यमय होण्याची चिन्हे दिसत आहेत.

