(मुंबई)
निवडणूक आयोगाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष आज (दि. १ नोव्हेंबर) मुंबईत एकत्र येत आहेत. ‘सत्याचा विराट मोर्चा’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेकाप आणि डावे पक्ष सहभागी होणार आहेत.
या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी नेते उपस्थित राहणार आहेत. मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट येथून होऊन मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत मोर्चा महापालिका मुख्यालयात पोहोचेल आणि तेथे प्रमुख नेत्यांची भाषणे होतील.
विरोधकांनी मतदार यादीतील घोळ, बोगस मतदार आणि मतचोरीविरोधात हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. “जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत,” अशी मागणी विरोधकांनी केली आहे. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच “मतचोरीचा” मुद्दा उचलल्यामुळे पक्ष आक्रमक भूमिकेत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटलं, “संविधान वाचवा, लोकशाही जगवा — चलो मुंबई! या सत्याच्या मोर्चात सहभागी होऊन लोकशाहीचे रक्षण करा.”
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात कायदेशीर लढाही सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधू मतदार यादीतील अनियमिततेविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित याचिका दाखल होणार असून, त्यासंबंधीचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात येतील. शिवसेना (उबाठा) नेते अनिल परब म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभारामुळे बोगस मतदारांचा उद्योग सुरू आहे. सत्य उघडकीस आणण्यासाठीच हा मोर्चा काढला जात आहे.”

