( कोल्हापूर )
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण अपघातात शाहूवाडी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मारुती विठ्ठल मकर (वय ३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारासाठी निघाले होते, पण काळाने घातला घाला
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मकर हे पत्नी काजल, मुलगी सई आणि मुलगा समर्थ यांना दुचाकीवरून (MH09 FU 5046) उपचारासाठी बांबवडे येथे घेऊन जात होते. त्याचवेळी हॉटेल टर्निंग पॉइंटजवळ वळणावर कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी शिवाई एसटी बस (MH 12 ZE 9435) आणि त्यांची दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मारुती मकर आणि त्यांची मुलगी सई ( वय वर्षे ४) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पत्नी काजल (वय वर्षे ३२) आणि मुलगा समर्थ ( वय वर्षे दिड ) हेही जखमी झाले.
रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू
सर्व जखमींना तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असतानाच मारुती मकर यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
मारुती मकर हे शाहूवाडी तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होते. अत्यंत शांत, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी होते. विशेष म्हणजे, या अपघाताच्या अवघ्या दोन दिवसांनी त्यांची सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्याच गावी माळशिरस येथे बदली होणार होती, त्यामुळे ते खूप आनंदात होते. मात्र नियतीने त्याआधीच त्यांच्यावर काळाचा घाला घातला. या घटनेमुळे प्रशासनात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

