(पुणे)
एमएसईबी होल्डिंग कंपनीतर्फे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महावितरणने दमदार कामगिरी करत चार सांघिक विजेतेपद आणि एक उपविजेतेपद पटकावले. महिला-पुरुष गटातील कबड्डी, खो-खो तसेच कुस्ती स्पर्धांमध्ये महावितरणच्या खेळाडूंनी एकतर्फी वर्चस्व गाजवले.
पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशभरातील विविध विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा शुक्रवारी (दि. ८) समारोप झाला. विशेष म्हणजे, महावितरणच्या पुरुष कबड्डी संघाने बलाढ्य हिमाचल प्रदेश संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत तब्बल १५ वर्षांनंतर विजेतेपदावर नाव कोरले.
स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना करंडक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यास संचालक (प्रकल्प) दत्तात्रेय पडळकर, महावितरणचे कोकण सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष व पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कबड्डीच्या अंतिम सामन्यात महावितरणची जबरदस्त पुनरागमन
कबड्डीच्या अंतिम सामन्यात मागील वर्षीचा विजेता हिमाचल प्रदेश आणि महावितरण हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले होते. सामन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेशने आक्रमक खेळ करत ६-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र, महावितरणच्या नीलेश ठाकूर याने केलेल्या आक्रमक चढाईमुळे सामन्याला कलाटणी मिळाली.
त्यानंतर कर्णधार अमित जाधव, अभिषेक नर, अजय शिंदे, रजत गोमासे, रोहित जिवतोडे, नीतेश पोवार, प्रतिक मुरकुटे आणि दीपक माने यांनी बचाव आणि आक्रमण यांचा उत्कृष्ट समन्वय साधत हिमाचल प्रदेशच्या बलाढ्य खेळाडूंना रोखले. मध्यंतरापर्यंत महावितरणने १७-१३ अशी आघाडी घेतली होती.
अत्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर महावितरणने हिमाचल प्रदेशचा ३४-२४ असा पराभव करत १५ वर्षांनंतर राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. संघाचे प्रशिक्षक नीलेश नाईक आणि व्यवस्थापक रामगोपाल अहिर यांचेही यशात मोलाचे योगदान ठरले.
महिला कबड्डीत उपविजेतेपद
महिला कबड्डी गटातही महावितरण आणि हिमाचल प्रदेश यांच्यात अंतिम सामना रंगला. मात्र, सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत हिमाचल प्रदेशने महावितरणचा २१-१२ असा पराभव केला. त्यामुळे महावितरणच्या महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, पुढील वर्षापासून राष्ट्रीय विद्युत क्रीडा स्पर्धेतील कुस्ती प्रकारात महिला गटाचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा नियंत्रण मंडळातर्फे यावेळी करण्यात आली.

