( जळगाव )
जळगावात एका हृदयद्रावक अपघाताने दोन कुटुंबांचा आनंद क्षणात दुःखात बदलला. लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर माहेरी जात असलेल्या 21 वर्षीय नववधू वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) यांचा भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरातील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर सासरचे सर्व विधी आणि देवदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण करून त्या आपल्या काकांसोबत दुचाकीवरून माहेरी जात होत्या.
विद्यापीठासमोर भीषण अपघात
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वैशाली दुचाकीवरून दूर फेकल्या गेल्या आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या धडकेमुळं वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात दुचाकी चालवत असलेले त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहन सोडून चालक फरार
अपघातानंतर चारचाकी चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन जप्त केले असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.
आनंदाचे घर क्षणात शोकसागरात
घटनेची माहिती मिळताच सासरचे आणि माहेरचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वी ज्या घरात सनई-चौघड्यांचे मंगल स्वर घुमत होते, लग्नाचा जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात आज शोककळा पसरली आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वी नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवून सासरी गेलेल्या वैशाली यांचा भीषण अपघातात झालेला मृत्यू दोन्ही कुटुंबांसाठी मोठा धक्का ठरला आहे. या अनपेक्षित दुर्घटनेने आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कठोर कारवाईची मागणी
या अपघाताला जबाबदार असलेल्या फरार चारचाकी चालकाला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी वाहन जप्त केले असून चालकाचा शोध वेगाने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

