(नाशिक)
बेकायदेशीर शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्रिपद गमावावे लागलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली. मात्र या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांची एकूण संपत्ती किती? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान कोकाटे यांचे वकील अॅड. रवी कदम यांनी सांगितले की, 1989 साली माणिकराव कोकाटे यांचे मासिक उत्पन्न केवळ 2,500 रुपये होते. त्यामुळे ते दुर्बल घटकात मोडत होते. पुढील काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारली, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणात फोर्जरी होत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे पाच वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले होते. मात्र शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे कोकाटे यांची संपत्ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, कोकाटे यांच्याकडे 31 लाख 55 हजार रुपये रोख, तर विविध बँकांमध्ये 36 लाख 65 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच कोकाटे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 4 कोटी 78 लाख रुपयांचे शेअर्स असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी 8 कोटी 86 लाख रुपये इतरांना दिले असल्याचे नमूद केले आहे.
कोकाटे यांच्या नावावर निफाड आणि सिन्नर तालुक्यात 26 एकर जमीन असून, तिची किंमत 16 कोटी 62 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याचबरोबर सिन्नर व नाशिकमध्ये त्यांच्या नावावर पाच आणि पत्नीच्या नावावर दोन, अशी एकूण सात घरे असून त्यांची एकत्रित किंमत 7 कोटी 4 लाख रुपयांहून अधिक आहे.
वाहनांबाबत सांगायचे झाल्यास, कोकाटे यांच्याकडे इनोव्हा हायक्रॉस (हायब्रिड), महिंद्रा थार, सोनालीका ट्रॅक्टर आणि बुलेट अशी चार मोठी वाहने आहेत. तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतःकडे 1,100 ग्रॅम सोनं, तर पत्नीच्या नावावर सुमारे दीड कोटी रुपयांचे सोनं असल्याचे नमूद केले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, माणिकराव कोकाटे यांची एकूण स्थावर मालमत्ता 42 कोटी 45 लाख रुपयांपेक्षा अधिक असून, यापैकी 35 कोटींहून अधिक मालमत्ता स्वतःच्या नावावर आहे.
विशेष म्हणजे, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांनी आपली मालमत्ता 6 कोटी 36 लाख, 2019 च्या निवडणुकीत 21 कोटी 44 लाख, तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 42 कोटी 45 लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या संपत्तीतील झपाट्याने झालेली वाढ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

