(चिपळूण/ प्रतिनिधी)
मालाड येथील एजाज कुरेशी हत्या प्रकरणातील गूढ उकलल्यानंतर अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात विशाल विजय खोडदेकर (रा. रामपूर), जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) आणि सागर ब्रिद (रा. रेहळ भागाडी) या तिघांचा समावेश असून, गुन्ह्याच्या तपासात उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक स्वरूपाची आहे. तपासानुसार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मालाड येथील जन्नतुनिसा खान हिच्या निवासस्थानी तिचा मित्र विशाल खोडदेकर याने एजाज कुरेशी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुरेशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्याचा माग काढता येऊ नये म्हणून खोडदेकर आणि खान यांनी मृतदेह एका बॅगेत भरून दुसऱ्या दिवशी रामपूर येथे आणला आणि खोडदेकर यांच्या मालकीच्या जागेत गुप्तपणे दफन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
काही महिने हे प्रकरण पूर्णपणे दडपून राहिले; मात्र फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या अनपेक्षित घटनेमुळे या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. विशाल खोडदेकर संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी रामपूर येथे आला असता, वन्य प्राण्यांनी जमीन उकरल्याने मृतदेहातील काही हाडे बाहेर पडलेली आणि परिसरात विखुरलेली दिसली.
दफन केलेल्या मृतदेहाचा माग पुन्हा समोर आल्याने घाबरलेल्या खोडदेकरने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ती हाडे गोळा करून त्यावर डिझेल ओतून जाळल्याचे तपासात समोर आले. मात्र परिसरात जळालेली हाडे आढळल्याने पोलिसांनी संशयाच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली आणि त्यातून हत्या तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा संपूर्ण कट उघड झाला. सध्या तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणातील इतर पैलू आणि संभाव्य पुरावे तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

