( मुंबई )
ऑनलाइन छळाच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 43 वर्षीय जयकुमार किशोर बिडीचंदानी याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. ही केवळ एक वेळची घटना नसून, संबंधित पीडितेला दीर्घकाळापासून लक्ष्य करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. ए. साबळे यांनी जामीन अर्जावर सुनावणी करताना सांगितले की, आरोपीला जामिनावर सोडल्यास तक्रारदार महिलेला पुन्हा छळ, धमक्या किंवा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
ईमेलचा गैरवापर करून अश्लील वेबसाइटवर नोंदणी केल्याचा आरोप
माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयकुमार बिडीचंदानी याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, 13 मार्च ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत आरोपीने पीडितेच्या ईमेल आयडीचा कथित गैरवापर करून तिची एका अश्लील वेबसाइटवर नोंदणी केली. त्यानंतर पीडितेला अश्लील स्वरूपाचे ईमेल आणि पोर्नोग्राफिक मजकूर पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय, विविध व्यक्तींच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट सोशल मीडिया प्रोफाइलच्या माध्यमातून पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आपल्याला तीव्र मानसिक त्रास झाला असून आरोग्यावरही परिणाम झाल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.
आरोपीविरोधात यापूर्वीही तीन गुन्हे दाखल
अभियोजन पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, पीडितेने आरोपीविरोधात दाखल केलेला हा चौथा गुन्हा आहे. आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, त्यानंतरही त्याने बनावट ऑनलाइन ओळखींचा वापर करून, अश्लील संदेश पाठवून आणि विविध वेबसाइटवर नोंदणी करून पीडितेला लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला.
बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला
जामिनासाठी अर्ज करताना बचाव पक्षाने आरोपीला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला. तसेच आरोपीचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांनी जप्त केली असून, त्यामुळे पुढील कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत म्हणून जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
‘हा सातत्याने होणारा छळ आहे’, पीडितेच्या वकिलांचा दावा
पीडितेचे वकील ॲड. जोशुआ अभय पट्टिगेरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, ही स्वतंत्र घटना नसून एकाच पीडितेला सातत्याने लक्ष्य करून करण्यात आलेला छळ आहे. आरोपीला यापूर्वी संधी मिळूनही त्याने पुन्हा पीडितेशी संपर्क साधल्याचा आणि अशाच प्रकारचे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला. जामीन मंजूर करताना पीडितेची सुरक्षितता, सन्मान आणि भीतीविना जगण्याचा अधिकार लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायालयाने जामीन अर्ज केला नामंजूर
आरोपांचे स्वरूप, तपासादरम्यान जमा करण्यात आलेले पुरावे, एकाच तक्रारदारावर वारंवार झालेल्या कथित छळाच्या घटना आणि पीडितेच्या सुरक्षेचा विचार करून न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. त्यानुसार, जयकुमार किशोर बिडीचंदानी याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

