(मुंबई)
मुंबई गुन्हे शाखेने तब्बल 28 वर्षे स्वतःला एमबीबीएस (MBBS) डॉक्टर म्हणून भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (CSR) निधीच्या नावाखाली सुमारे 10 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या टोळीचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून इतर अनेक राज्यांपर्यंत पसरल्याची धक्कादायक माहितीही तपासातून उघड झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त (DCP) राज तिलक रोशन यांनी ही माहिती दिली.
12 वीही उत्तीर्ण नाही, तरी 28 वर्षे ‘डॉक्टर’ म्हणून वावर
अटक करण्यात आलेला आरोपी धर्मेंद्र कुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याने बारावीची परीक्षाही उत्तीर्ण केलेली नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. असे असतानाही तो गेली जवळपास 28 वर्षे स्वतःला एमबीबीएस डॉक्टर म्हणून सादर करत होता. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी तो विविध ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करत असे. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या काही वैद्यकीय शिबिरांमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहिल्याचे सांगितले जाते.
सेलिब्रिटींसोबतचे फोटो वापरून विश्वास संपादन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र कुमार हा वैद्यकीय शिबिरांमध्ये उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींसोबत काढलेली छायाचित्रे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरत असे. या छायाचित्रांच्या माध्यमातून तो स्वतःची विश्वासार्हता वाढवत असे आणि त्यानंतर विविध संस्था, कंपन्या आणि व्यक्तींना विश्वासात घेऊन कथित फसवणूक करत होता.
बोगस DCP प्रकरणातून लागला धागा
मुंबई गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी मोहम्मद गौस इब्राहिम खतीब (वय 52, ऊर्फ डॉ. राज खतीब) या बोगस डीसीपीसह तिघांना अटक केली होती. या तपासादरम्यान धर्मेंद्र कुमारचे नाव समोर आले. चौकशीत असे निष्पन्न झाले की, बोगस डीसीपी खतीब याने धर्मेंद्र कुमार आयोजित करत असलेल्या काही वैद्यकीय शिबिरांनाही भेट दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेने धर्मेंद्र कुमारला चौकशीसाठी बोलावले.
व्हिजिटिंग कार्डमुळे उघड झाला भांडाफोड
धर्मेंद्र कुमार चौकशीसाठी हजर झाल्यानंतर त्याने स्वतःला डॉक्टर असल्याचे दर्शवणारे व्हिजिटिंग कार्ड उपायुक्त राज तिलक रोशन यांना दिले. अधिकाऱ्यांनी त्याच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत आणि एमबीबीएस पदवीबाबत सविस्तर प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरे विसंगत आढळली. चौकशीत तो अडखळू लागल्याने संशय अधिक बळावला. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो बनावट डॉक्टर असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला तत्काळ अटक करण्यात आली.
घरावर छापा; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
अटकेनंतर गुन्हे शाखेने आरोपीच्या निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईत महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांतील व्यक्ती, कंपन्या आणि संस्थांशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच विविध CSR प्रकल्पांचे अहवाल, आर्थिक व्यवहारांची माहिती, संस्थांशी झालेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवजही पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्राथमिक तपासात या कागदपत्रांमधून कोट्यवधी रुपयांच्या निधीची अफरातफर झाल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात गेल्या तीन वर्षांत CSR निधीच्या नावाखाली सुमारे 10 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
बनावट ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रेही जप्त
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये ‘डॉ. धर्मेंद्र कुमार’ या नावाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, विविध संस्थांनी दिलेली प्रमाणपत्रे तसेच वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित साहित्याचा समावेश आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, अनेक वर्षे डॉक्टर असल्याचे भासवून आरोपीने स्वतःची विश्वासार्ह प्रतिमा तयार केली आणि त्याचाच गैरफायदा घेत विविध प्रकारच्या कथित आर्थिक फसवणुका केल्या.
या प्रकरणाची सुरुवातीला जुहू पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आरोपी धर्मेंद्र कुमारला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आर्थिक गैरव्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, आरोपीने किती जणांची फसवणूक केली आणि CSR निधीचा नेमका वापर कुठे झाला, याचा सखोल तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
बोगस डॉक्टर धर्मेंद्र कुमारला मोहम्मद गौस इब्राहिम खतीब (उर्फ डॉ. राज खतीब) या बनावट डीसीपी प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच धर्मेंद्र कुमारचे नाव समोर आले आणि त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने त्याच्यावर कारवाई केली. तपासानुसार, मोहम्मद गौस इब्राहिम खतीब हा स्वतःला मुंबई पोलिसांचा डीसीपी असल्याचे भासवत होता. तो आपल्या वाहनावर ‘पोलीस’ असा फलक लावून फिरत असे आणि सरकारी अधिकाऱ्याचा अधिकार गाजवत लोकांचा विश्वास संपादन करत होता.
याच विश्वासाचा गैरफायदा घेत तो बँक कर्ज मंजूर करून देणे, बिल्डरांकडे अडकलेले पैसे परत मिळवून देणे, फ्लॅट मिळवून देणे, तसेच पोलीस दलात भरती करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना उघड झालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारेच बोगस डॉक्टर धर्मेंद्र कुमारचे कथित गैरव्यवहार समोर आले.

