(पुणे)
तरुणांमध्ये मानसिक ताण, भावनिक गोंधळ आणि असुरक्षिततेच्या काळात मदत मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेने उघड केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात संस्थेच्या हेल्पलाइनवर आलेल्या सुमारे ९ हजार कॉल्सपैकी तब्बल ९०० कॉल्स हे एआय प्लॅटफॉर्म्सकडून मिळालेल्या सूचनेवरून करण्यात आले होते. तरुण ‘एआय’समोर मन मोकळं करून बोलतात आणि त्यानंतर व्यावसायिक मदतीकडे वळण्याची प्रवृत्ती लक्षणीय वाढत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
हेल्पलाइन प्रोग्राम कोऑर्डिनेटर विक्रम पवार यांनी सांगितले की, चॅटजीपीटीसह विविध एआय चॅटबॉट्स तरुणांची भावनिक स्थिती ओळखण्याचा प्रयत्न करतात. आत्महत्येची चिन्हे दिसल्यास ते थेट मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधण्याची सूचना देतात. ऐकून घेणे, भावनिक मान्यता देणे आणि सोपी कृतीशील दिशा सुचवणे या वैशिष्ट्यांमुळे तरुण एआयशी अधिक खुलून बोलतात, असे पवार यांनी नमूद केले. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, तर आसाम, मेघालय, कोलकाता, जमशेदपूर आणि बिहारमधूनही फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कनेक्टिंग ट्रस्टच्या २० वर्षांच्या अनुभवातून उघड झालेल्या आकडेवारीनुसार, मानसिक आधारासाठी मदत मागणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष तर ३५ टक्के महिला आहेत. सामाजिक अढीमुळे पुरुष आपला भावनिक तणाव दडपून ठेवतात, आणि त्यामुळे व्यसनाकडे वळण्याचा धोका अनेकदा वाढतो, असे निरीक्षण संस्थेने नोंदवले.
आत्महत्येची कारणे उदा. ब्रेकअप, परीक्षेत कमी गुण किंवा कुटुंबातील वाद अशा वरवरच्या घटनांशी जोडली जातात; पण प्रत्यक्षात त्यामागे दीर्घकाळ साचलेली वेदना, सामाजिक तणाव, एकाकीपणा आणि न दिसणाऱ्या भावनिक जखमा दडलेल्या असतात, असेही संस्थेने नमूद केले.

