(मुंबई)
महाराष्ट्राची आराध्या पांडे हिने 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील वडोदरा येथे झालेल्या 21व्या WKI आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला. वाडो-काई इंडिया (WKI) यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांतील कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.
आराध्याच्या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून अभिनंदन करत लिहिले, “वडोदरा येथील WKI स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून तू भारताचा मान वाढवला. महाराष्ट्राची कन्या असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
या अजिंक्यपद स्पर्धेत काटा आणि कुमिते या दोन मुख्य प्रकारांत खेळाडूंची चाचणी घेण्यात येते.
- कुमिते प्रकारात, आराध्याने नेपाळच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.
- काटा प्रकारात, तिने श्रीलंकेच्या खेळाडूवर मात करत कांस्यपदक जिंकले.
तिच्या तंत्र, संतुलन, नियंत्रण आणि लढाऊ वृत्तीचे परीक्षकांसह उपस्थित प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले.
फोरमोस्ट फायटर कराटे अकादमीच्या इतर विद्यार्थ्यांनीही विविध श्रेणींमध्ये पदकं जिंकत भारताच्या कामगिरीत भर घातली. प्रशिक्षक पुरु रावल म्हणाले, कठोर परिश्रम, शिस्त आणि योग्य प्रशिक्षणामुळे ही मुलं भविष्यात आणखी मोठे आंतरराष्ट्रीय यश मिळवतील.
आपला विजय देशाला समर्पित करत आराध्याने सांगितले, भारताची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर आणखी उंचावण्यासाठी मी अधिक मेहनत घेणार आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती महाराष्ट्रासह देशभरातील तरुण कराटेपटूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

