(वैभववाडी / सिंधुदूर्ग)
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील शेततळ्यात मुंबईतील एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या सिद्धांत प्रकाश जाधव (वय २४, रा. मुंबई सांताक्रूझ, मूळ गाव नरडवे, ता. कणकवली) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (११ जुलै) सायंकाळी घडली. रविवारी सकाळी शोधमोहीम राबवल्यानंतर सुमारे १५ ते २० फूट खोल पाण्यात सिद्धांतचा मृतदेह आढळून आला.
मित्रांसोबत कोकिसरे येथे आला होता
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ येथील सिद्धांत जाधव आणि त्याचे मित्र कोकिसरे येथील मित्र प्रसाद वळंजू यांच्या गावी फिरण्यासाठी आले होते. या गटात एकूण १५ जणांचा समावेश होता. १० जुलै रोजी हे सर्वजण कोकिसरे येथे दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण केल्यानंतर काही मित्र कोकिसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते.
अंघोळीसाठी उतरला आणि पाण्यात बेपत्ता झाला
शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काही मित्र पाण्यात उतरले, तर काहीजण बंधाऱ्यावर बसले होते. यावेळी सिद्धांत जाधवही अंघोळीसाठी पाण्यात उतरला होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्व मित्र घरी जाण्यासाठी निघाले असता सिद्धांत जाधव दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. अंघोळीसाठी पाण्यात उतरताना सिद्धांतने काढून ठेवलेले कपडे, चप्पल आणि मोबाईल पाण्याजवळ आढळून आले. त्यामुळे तो पाण्यात बुडाला असावा, असा संशय मित्रांना आला. त्यानंतर मित्रांनी तातडीने पाण्यात शोध घेण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना याबाबत कळवण्यात आले. त्यांनी तातडीने वैभववाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
ग्रामस्थ आणि पोलिसांकडून शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि वैभववाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी सकाळी पोलिस, मित्र आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यातील खोल पाण्यात सिद्धांतचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

