( मुंबई )
मुंबईसह राज्यभर वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर 1 मार्चपासून राज्यभर प्रभावी आणि कडक मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
विधानभवनात झालेल्या बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, वाहनांची नियमित तपासणी न करणे आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळवणे कठीण होते. अनेक प्रकरणांत वाहनमालक किंवा चालक जबाबदारी टाळतात, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो.
कायदेशीर वाहतुकीला प्रोत्साहन, प्रवाशांचीही जबाबदारी
ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून कायदेशीर वाहतूक सुलभ करणे आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचाच वापर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई आणि जनसहभाग या दोन मार्गांनीच सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था उभी राहू शकते, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महसुलावर फटका; एसटीसारख्या सेवांवर परिणाम
अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नियम पाळणाऱ्या एसटी महामंडळ सारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचे ओझे येते. दरकपात आणि अनियमित बाजारपेठेमुळे अधिकृत सेवा आर्थिक अडचणीत सापडतात. परिणामी प्रवासीसंख्या घटते आणि नियोजित मार्ग व वेळापत्रकावरही परिणाम होतो.
सामाजिक सुरक्षेचा मुद्दा; जनजागृतीवर भर
तज्ज्ञांच्या मते, अवैध प्रवासी वाहतूक हा केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक सुरक्षेचाही गंभीर मुद्दा आहे. अशा वाहनांमुळे मानवी तस्करी, लुटमार किंवा इतर गुन्ह्यांना वाव मिळू शकतो. प्रवाशांची नोंद उपलब्ध नसल्याने तपास यंत्रणांना अडचणी येतात. वेगमर्यादा भंग, बेदरकार वाहनचालकता आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण वाढते.
या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभाग यांनी कडक अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि व्यापक जनजागृती यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

