(नवी मुंबई)
रबाळे पोलिसांनी नवी मुंबईतील नागरिकांना अमेरिकन डॉलर कमी दरात देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या झारखंडस्थित टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने घनसोलीतील एका तरुणाकडून तब्बल ₹३ लाख घेऊन डॉलर न देता फसवणूक केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना अटक केली असून, या कारवाईत तीन फसवणुकींचा उलगडा झाला आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत — मोहम्मद राहुल लुकमान शेख उर्फ रफीक, आलमगीर आलम सुखखू शेख, खोसमुद्दीन मोहम्मद शेख उर्फ येलीम, रिंकू अबुताहीर शेख, रोहीम बकसर शेख आणि अजीजुर रहमान सादिक शेख (सर्व रा. मुंब्रा, ठाणे). प्राथमिक तपासात हे सर्व आरोपी झारखंडस्थित टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले असून, त्यांनी नवी मुंबईसह राज्यातील इतर भागातही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहा. पो.नि. दीपक खरात यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि CCTV पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केली. “नागरिकांनी चलनविषयक आमिषांना बळी न पडता केवळ अधिकृत मार्गांचा वापर करावा,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

