(मुंबई/ रत्नागिरी)
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर गुरुवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलनात विविध विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटना एकवटल्या होत्या. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी आंदोलकांना अडवत अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत “याचे परिणाम मुख्यमंत्र्यांना भोगावे लागतील,” असा इशारा दिला.
कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, तसेच केंद्र सरकारने कांदा आणि साखर निर्यातीवर लादलेल्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’कडे जाणाऱ्या या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी निषेध म्हणून रस्त्यावर आंबे फेकत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी शिवालय बंगल्याजवळ मोर्चा रोखत राजू शेट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर, विनायक राऊत, शेखर पाटील आदी नेत्यांना ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांकडून आंदोलकांना फरफटत नेण्यात आल्याचे दृश्य समोर आले असून, धक्काबुक्की आणि बळाचा वापर झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. “आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. आम्ही शिवालय येथे शांततेत जमलो असताना अचानक पोलिसांनी येऊन आम्हाला ताब्यात घेतले. आम्ही आंदोलन स्थळावर पोहोचलोही नव्हतो. तरीही पोलिसांनी उर्मट भाषा वापरत बळाचा वापर केला. अनेक कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि लाठीचार्जमध्ये दुखापत झाली,” असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर टीका करताना शेट्टी म्हणाले, “गेल्या अडीच महिन्यांपासून कोकणातील शेतकरी न्यायासाठी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री अनेक वेळा कोकणात आले, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची किंवा त्यांचे निवेदन स्वीकारण्याचीही त्यांनी तसदी घेतली नाही. कोकणातील शेतकरी तब्बल ५० वर्षांनंतर प्रथमच आपल्या हक्कासाठी मुंबईत उतरला होता; पण त्यांना पोलीस खाक्या दाखवण्यात आला. हा शेतकऱ्यांचा अपमान असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे त्यांनी ठणकावले.
या आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलन अधिकच चिघळण्याची चिन्हे असून राज्याच्या राजकारणातही या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

