(दापोली)
दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक तथा ह.भ.प. विलास कर्वे यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा यावर्षीचा ‘उत्कृष्ट संगीत नाटककार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संगीत रंगभूमीवरील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. कै. अ. ना. भालेराव यांच्या स्मृतिदिनी बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव सभागृहात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दरवर्षी नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांचा ‘नाट्य सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो. यंदाच्या श्री य. वि. भातखंडे पुरस्कृत डॉ. अ. ना. भालेराव स्मृती प्रीत्यर्थ ‘संगीत नाटककार’ पुरस्कारासाठी विलास कर्वे यांची निवड करण्यात आली असल्याचे संघाने जाहीर केले आहे.
विलास कर्वे यांनी ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘ज्ञानियांचा राजा’ आणि ‘श्यामची आई’ या संगीत बालनाट्यांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण केले आहे. तसेच ‘गोपिका रमणू स्वामी माझा’, ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ आणि ‘संभवामी युगे युगे’ ही संगीत नाटके महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेसाठी सादर केली आहेत. त्यांच्या ‘गोपिका रमणू स्वामी माझा’ या नाटकाला राज्यस्तरीय लेखनाचा प्रथम क्रमांक, तर ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या नाटकाच्या लेखनासाठी द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.
सध्या त्यांनी ‘संगीत स्वर संगम’ आणि ‘संगीत शिवरंजनी’ ही दोन नवीन संगीत नाटके लिहिली असून ती लवकरच महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर होणार आहेत. यापैकी ‘संगीत स्वर संगम’ हे दापोली पंचक्रोशीतील एका प्रसिद्ध व्यावसायिक संगीत नाटक कलाकार आणि त्यांच्या गुरू-शिष्य नात्यावर आधारित आहे, तर ‘संगीत शिवरंजनी’ हे श्री शिवमहापुराणातील एका पौराणिक कथेला केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विलास कर्वे यांनी मुंबई मराठी साहित्य संघ, पुरस्कार निवड समिती तसेच आपल्या गुरूजन, सहकलाकार, गायक, गायिका, संगीतकार, तंत्रज्ञ आणि रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. हा पुरस्कार आपल्या कुटुंबीयांसह सर्व सहकाऱ्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील छोट्या गावातील एका रंगकर्मीसाठी हा सन्मान अत्यंत प्रेरणादायी असल्याचे नमूद करत, समृद्ध संगीत रंगभूमी अधिक वैभवशाली करण्यासाठी कोकणात अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

