( रत्नागिरी )
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते पावस मार्गावर नगर वाचनालयासमोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलवंत मोहन जोंधळे (वय ४१, मूळ रा. लोहा, जि. नांदेड, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जयस्तंभ येथील नगर वाचनालयासमोर घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज विजय कांबळे (वय ४३, रा. उत्कर्षनगर, कुवारबाव) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-08 BC-7681) घेऊन खारेघाट रोडवरून कुवारबावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी रत्नागिरीहून पावसकडे जाणारी एसटी बस (क्र. MH-14 BP-3889) चालवित असलेल्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून रिक्षाला धडक दिली.
या धडकेमुळे रिक्षा पुढे जाऊन जवळ उभी असलेल्या दुचाकीला (क्र. MH-08 BA-6333) धडकली. या अपघातात रिक्षा आणि दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याप्रकरणी रिक्षाचालक मनोज कांबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालक सिलवंत जोंधळे यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

