(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वे स्टेशन परिसरात परतीच्या प्रवासात शनिवार सकाळपासून तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. येथे रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुतर्फा वाहनांच्या रांगा लांबच लांब पसरल्या आहेत, यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, संबंधित ठेकेदार कंपनीने या परिसरातील रस्त्याचे काम अर्धवट ठेवले असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे अवजड वाहनांच्या हालचालीत मोठा अडथळा निर्माण झाला असून, वाहतूक व्यवस्थेचा ताण वाढला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी शहरात तसेच परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, व नैसर्गिक पर्यटनस्थळांवर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे.

